Reg No. F-51/Satara/30/4/1963 Mumbai/69/N.S.T.R

blog

कृतार्थता ( श्री. टी. के. बाबर सर )
७ जानेवारी २०१४

१९६९ च्या ऑक्टोंबर महिन्यात आमच्या गावची यात्रा होती. यात्रेत आमचे मित्र श्री. उत्तमराव पवार भेटले. तू काय करतोस असे विचारले. मी त्यावेळी एम कॉम च्या दुसऱ्या भागाच्या परीक्षेचा अभ्यास करीत होतो. पवार म्हणाले शिक्षकांची नोकरी तू करशील का ? तिथे तुला अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळेल. व पगारही मिळेल मी लगेचच हो म्हणालो. त्यांनी माझ्या नोकरीसाठी चा अर्ज लिहून घेतला. त्यांना संस्थेचे नाव माहीत नव्हते. ती पत्याची जागा कोरीच ठेवली. तो अर्ज आजही संस्थेच्या दप्तरी आहे.

श्री. पवार यांनी अर्ज संस्थेकडे दिला पाच-सहा दिवसांनी मला एक पोस्टकार्ड आले. त्यात मला ‘दत्त सायकल मार्ट साबणे रोड महाबळेश्वर’ येथे मुलाखतीसाठी बोलावले होते माझी कागदपत्र घेऊन मी नेमलेल्या दिवशी मुलाखतीसाठी गेलो. मुलाखत घेण्यासाठी एक गोरीपान उंच सडपातळ खादीचा पेहराव असलेली व्यक्ती होती. ‘फळणे गुरुजी’. मुलाखतीत तळदेव कुठे आहे, कसे आहे. तेथे काय अडचणी आहेत. स्वयंपाक हाताने करावा लागेल. वगैरे अडचणी सांगितल्या, तिथे शिक्षक राहत नाहीत. टिकत नाहीत आणि ग्रॅज्युएट तर महिना दोन महिन्यांपेक्षा जास्त थांबत नाहीत. तेव्हा शाळेत मुले आहेत ना मग मी नक्कीच थांबेन. किमान चालू वर्षाच्या वार्षिक परीक्षेपर्यंत तरी थांबेन असे सांगितले. मग उद्याच हजर व्हा असे ते म्हणाले. मी चार-पाच दिवसांनी हजर राहतो म्हणून सांगितले.

तळदेवला हजर राहण्यासाठी मी पवारांकडे महाबळेश्वर येथे गेलो. तीन चार वाजण्याच्या दरम्यान श्री पवार व मी रस्त्यावर थांबलो. तेथे इतर अनेक लोक आपले सामान (बाचकी) घेऊन ट्रक ची वाट पाहत होते. ट्रक एक छोटी गाडी ‘खेकडा’ आली लोक भरभर गाडीत चढू लागले. मलाही पवारांनी गाडीत चढण्यास सांगितले. चढत असताना कोणीतरी माझ्या हातावर पाय देऊन मला ढकलून गाडीत चढले. बोटावर पाय दिल्याने इजा झाली. मी बाजूला होऊन मी काही तळदेवला जात नाही. मला नोकरी नको असे श्री पवार यांना सांगितले. आम्ही पवारांच्या खोलीवर परत आलो. संध्याकाळी दोघांनी स्वयंपाक केला, जेवलो झोपण्यापूर्वी पवारांनी माझी समजूत काढून तळदेवला जाण्यासाठी मला प्रवृत्त केले . दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जेवण करून पवारांनी मला स्वतःची सायकल दिली. महाबळेश्वर ते तळदेव पर्यंतचा रस्त्याचा नकाशा काढून दिला. जिथे मोठ्या इमारती दिसतील तेथे थांबा असे सांगितले. रस्त्यावरची सगळी खडी उदसलेली होती. मोठमोठे खड्डे पडलेले होते. त्यामुळे सायकल वरून जाणे ही कठीण होत होते. ठीक ठिकाणी बरेच अंतर पायी चालत अकरा वाजण्याच्या सुमारास शाळेत पोहोचलो.

शाळेत तीन शिक्षक होते. मी चौथा, मुख्याध्यापक नव्हते. त्यामुळे मला कोणीच हजर करून घेतले नाही. तीन दिवस गेले. शनिवारी सर्वजण गेले, मी थांबलो. दोन दिवस मी सूर्यवंशी या शिक्षकांकडे थांबलो. सोमवारी दुपारपर्यंत चार शिक्षक आले. त्यात मुख्याध्यापक होते, पण शनिवारी केलेल्यापैकी कोणीच नव्हते. नंतर समजले की शाळेत सहा शिक्षक होते. मी सातवा, दर आठवड्याला आळीपाळीने तीन शिक्षकांनी शाळेत यायचे व तिघांनी सुट्टी घ्यायची. शाळेत पाचवी ते दहावी ६ वर्ग होते सर्व शाळेत ६५ ते ७० विद्यार्थी हजर असायचे. त्यातील तीस ते पस्तीस विद्यार्थी वस्तीगृहात राहायचे शुक्रवारी शाळा सुटली की सर्व विद्यार्थी घरी जायचे. शनिवारी शाळेत गावातील व आजूबाजूचे पंधरा-वीस विद्यार्थी शाळेत यायचे. त्यामुळे शनिवारी वर्ग चालायचे नाही. पहिले दोन तास झाले की सुट्टी व्हायची. पुन्हा सोमवारी दुपारपर्यंत शिक्षक व विद्यार्थी हजर व्हायचे. त्यामुळे सोमवारी शाळेत शिकविणे व्हायचे नाही. अशाप्रकारे प्रत्यक्षात मंगळवार ते शुक्रवार असे चार दिवस पूर्णवेळ शाळा असायची. मुख्याध्यापक श्री. किरपेकर शाळेत नसताना किंबहुना असतानाही त्यांनी शाळेचे पूर्ण कामकाज माझ्यावर सोपवले. मी, सूर्यवंशी बावळेकर व अधीक्षक सुभाष कदम हळूहळू पूर्ण आठवडाभर शाळा चालू ठेवू लागलो. वसतिगृहातील मुले शुक्रवारी घरी न जाता शनिवारी शाळा सुटल्यानंतर जाऊ लागली. गेले चार पाच महिने शिक्षकांना पगार मिळाला नव्हता. त्यावेळी तिमाही अनुदान मिळत असे परंतु तळदेव शाळेचे अनुदान आले नव्हते. फेब्रुवारी १९७० मध्ये महाबळेश्वरचे शिक्षण विस्तारा अधिकारी श्री शेख साहेब शाळेत आले होते त्यावेळी अनुदानाबाबत चर्चा झाली. शाळेची सरासरी हजेरी कमी असल्याने अनुदानात कपात झाली आहे. व आता अनुदान उणे (Minus) असल्याने अनुदान मिळणारच नाही. असे त्यांनी सांगितले अनुदान मिळण्यासाठी काय करता येईल का असे मी त्यांना विचारले तेव्हा डोंगरी भागात सरकारी हजेरीत सूट देण्याचा अधिकार शिक्षण संचालकांना आहेत. तेथील अडचणी मांडून अर्ज केला तर हजेरीत सूट मिळेल असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे अर्ज तयार करून पाठविला. विशेष म्हणजे मार्चचे तिसऱ्या आठवड्यात पुण्याहून उपशिक्षक मंडळ संचालक (एक महिला अधिकारी त्यांचे नाव आठवत नाही) आली त्यांना शाळेचे बाजूच्या कड्यावरून कोयनेच्या खोऱ्यातील छोटी छोटी गावे दाखविली व मुलांना तेथून डोंगर चढून उतरून दररोज शाळेत येणे कठीण आहे, हे पटवून दिले. नंतर दहा दिवसातच सरासरी हजेरीत कपात केलेले अनुदान मंजूर केल्याचे पत्र आले. शिक्षकांचे पगार झाले. संस्थाचालकांना ही हायसे वाटले.

मुख्याध्यापक पदावर नसताना आठवडाभर शाळा चालविणे व कपात झालेले अनुदान मिळविणे ही दोन्ही कामे झाल्याने श्री फळणे गुरुजी व आदरणीय कै.एम आर भिलारे साहेब यांचे माझ्याबद्दल मत चांगले झाले. थोड्याच दिवसात श्री. किरपेकर बी.एड. ट्रेनिंगसाठी गेले. माझ्यावर मुख्याध्यापकाची जबाबदारी सोपविली. जुलैमध्ये शाळेला सुट्टी लागली. तोपर्यंत माझा एम.कॉम. चा निकाल आला होता. मला बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण डी. पी. भोसले कॉलेज कोरेगाव व आष्टा कॉलेज अशा तीन ठिकाणी प्राध्यापकाच्या ऑर्डरी मिळाल्या होत्या. शाळेला मान्यता आहे. परिसरात भरपूर विद्यार्थी आहेत. मुलांसाठी मोफत वसतिगृह आहे. परंतु शाळेची दररोज काळजीपूर्वक व्यवस्था करणारे कोणी नाही. असे लक्षात आले. त्यामुळे त्या नेमणुका न स्वीकारता तळदेव येथेच राहिलो.

मुख्याध्यापकाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तीन महत्त्वाच्या अडचणी पुढे होत्या. विद्यार्थी मिळविणे, पात्र व पुरेसे शिक्षक मिळविणे व वसतिगृहातील खर्चाची व्यवस्था करणे. जुलै मध्ये सुट्टी लागली १५ ऑगस्टला शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक मिळविण्याचे ठरविले. प्रशिक्षित शिक्षक मिळत नव्हते. त्यात तळदेवला येण्यास कोणी तयार नसायचे. मग किमान पदवीधर व गरजू लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. एखाद्या सायन्सचा पदवीधर किंवा इंग्रजीचा पदवीधर एखाद्या गावी आहे, असे समजले मी त्याचे नाव घेऊन त्याच्या घरी जात असे. त्यांचे घरचे लोकांना व त्याला नियमाप्रमाणे पूर्ण पगार देऊ. पगार होईपर्यंत रहाण्या-जेवण्याची मोफत सोय करू . अशी आमिषे दाखवून त्याला तयार करायचे. अगदी विनोदाने सांगायचे झाले तर एखादा वडील आपल्या मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी गावोगावी जसा फिरतो त्याप्रमाणे शिक्षक मिळविण्यासाठी मी फिरलो. अशाप्रकारे शाळेच्या पहिल्या दिवशी माझ्यासह एकूण नऊ शिक्षक हजर राहिले.

आता दुसरी अडचण राहिली विद्यार्थ्यांची! ज्यावेळी पावसाळी सुट्टीनंतर विद्यार्थी लवकर शाळेत येत नसत. गणपती व गौरीचा सण झाल्यानंतरच विद्यार्थी यायचे. मग विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ज्या गावची जास्त विद्यार्थी असतील तेथे शिक्षक पाठवायचे. दूध घालायला आलेल्या लोकांकडे रोज निरोप द्यायचे. खऱ्या अर्थाने शाळा गौरी गणपती झाले नंतर सुरू व्हायची .त्या वेळी शाळा १२५ ते १५० विद्यार्थ्यावर चालली त्यामुळे सरासरी हजेरीच्या फटका बसलाच.

तिसरी महत्त्वाची अडचण राहिली वस्तीगृहाच्या खर्चाची. त्यावेळी महाबळेश्वर पंचायत समिती आपल्या शेष फंडातून प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा २० रुपये विद्यावेतन देत असे. त्यावर वस्तीगृहाच्या खर्च चालत असे परंतु दुर्दैवाने शेष फंडातून मिळणाऱ्या अनुदानाची मदत संपली व अनुदान बंद झाले. श्री फळणे गुरुजी सभापती होते. त्यांनी बी. डी. ओ. व कलेक्टर यांचेशी अक्षरशहा भांडण करून त्या वर्षाचे व मागील राहिलेले काही थकीत अनुदान मिळविले व वस्तीगृह चालू राहिले. त्यानंतर वसतिगृहाचे अनुदान वेळोवेळी व पूर्ण कसे मिळेल यासाठी स्वतः लक्ष घातले व वस्तीगृहाच्या अनुदानाची अडचण सुकर झाली. त्यांचे शांत व मनमिळावू स्वभावामुळे आम्हा सर्वांनाच त्यांच्याबद्दल नितांत आदर वाटतो.

त्यावेळी (१९७०-७१) शालेय अकरावीचा (एस. एस.सी.) वर्ग नव्हता. त्यामुळे शाळेची गुणवत्ता इयत्ता सातवीचे निकालावरून ठरायची. सातवीची केंद्र परीक्षा महाबळेश्वरला व्हायची. याअगोदर लागोपाठ चार वर्षे इयत्ता सातवी चा निकाल १० ते १५ टक्के लागून दोनदा शून्य टक्के लागला होता. आम्ही सर्व शिक्षकांनी इयत्ता सातवी चा निकाल वाढविण्याचे दृष्टीने प्रयत्न केला. व त्यावर्षी निकाल ५४ टक्के लागला. या निकालामुळे विद्यार्थी पालक व संस्थाचालक यांचा आमच्यावरील विश्वास अधिकच वाढला संस्थेने मला बीएडला पाठवायचे ठरविले. जून १९७१ पासून मी बीएड ला गेलो. श्री किरपेकर मुख्याध्यापक झाले.

एप्रिल १९७२ ला बीएड होऊन परत आलो. दरम्यान अपुरी प्रशिक्षित शिक्षक, अपुरे विद्यार्थी, फर्निचर, शैक्षणिक साहित्य यांचा अभाव यामुळे शिक्षण खात्याकडून शाळा बंद का करू नये अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस संस्थेला आली. आदरणीय एम. आर. साहेबांनी ग्रामस्थ शिक्षक व संचालक यांची एकत्र सभा घेऊन शाळा बंद करत असल्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शाळा बंद करू नका मी शाळा चालवितो अशी विनंती केली . त्यावेळी श्री फळणे गुरुजी यांनी मला आपण बाबर यांना शाळा चालविण्याची एक वर्षे संधी देऊन आवश्यक वाटल्यास पुढील वर्षी बंद करू असे सुचविले. त्यावर “शाळा चालविणे म्हणजे पोरखेळ समजता का?” असे एम आर साहेब म्हणाले. “मी पूर्ण जबाबदारीने बोलतोय, मी शाळा चालवेन” असे मी सांगितले मग शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. शाळा चालू राहून मी पूर्ण मुख्याध्यापक झालो. श्री किरपेकर यांनी राजीनामा दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी शिक्षकांची सभा घेतली. सभेत शाळेत पडेल ते काम करण्याची उदाहरणार्थ विद्यार्थी गोळा करण्यासाठी जाणे वसतिगृहासाठी मुलांचे बरोबर जाऊन सरपण आणणे आणि वेळ पडल्यास स्वयंपाकात मदत करणे शाळेची स्वच्छता करणे इत्यादी कामे करण्याची ज्यांची तयारी असेल अशा शिक्षकांनी थांबावे. किंवा ज्यांना हे शक्य होणार नाही त्यांनी आत्ताच जावे, असे सांगितले. त्यावेळी श्री देसाई श्री देव व श्री शिंदे हे तीन शिक्षक सोडून गेले. सुट्टी सुरू झाली. पुन्हा शिक्षक मिळविण्याचा मागील प्रयोग केला. त्यावेळी श्री आर पी फरांदे, श्री सुभाष कदम, श्री एच आर पवार, श्री धर्मराज ससाने, श्री सूर्याजी जाधव इत्यादी कर्तबगार व जीवास जीव देणारे उत्साही सहकारी शिक्षक मिळाले.

विद्यार्थी संख्येचे संकट होतेच, पुढील वर्षाचे प्रवेशासाठी यावर्षी यावर्षीचे सुरुवाती पासूनच नियोजन केले. दोन-दोन शिक्षकांचे गट केले. मंगळवार, बुधवार व गुरुवार अशा तीन दिवशी या दोन दोन शिक्षकांनी एका गावी रात्री जायचे. तेथील सरपंच, पाटील प्रतिष्ठित अशा दोन तीन व्यक्ती आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक यांना भेटून पुढील वर्षी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी मुले पाठवणे बद्दल समजावून सांगायचे असा उपक्रम सहा ते सात महिने नियमित राबविला. गावची यात्रा, पूजा, लग्न समारंभ अशा प्रत्येक कार्यक्रमाला शिक्षक हजर रहात व शाळेबद्दलची माहिती सांगून मुलींना शाळेत पाठविणेबद्दल सुचवीत असत. त्यामुळे लोकांचा संपर्क वाढला. दवाखान्यात आलेल्या पेशंटला व त्याचे बरोबरच्या लोकांना कित्येक वेळा भात शिजवून देणे. अंथरून पांघरून देणे व इतर सहकार्य आम्ही सर्वजण करत असू. त्यामुळे सर्व शाळेबद्दल व शिक्षकांबद्दल पाणी पालकांमध्ये आदर वाढला.

नवीन शाळा सुरू करून चालविणे व बंद पडत असलेली शाळा पुन्हा चालविणे यात खूप फरक आहे. नवीन शाळेला सर्वांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळते पण बंद पडत असलेल्या शाळेला सहकार्य मिळणे तसे कठीणच. गावागावात असेच विद्यार्थी मिळविणेसाठी ग्रामस्थांची सभा आम्ही शिक्षकांनी घेतली. मुले पाठवा म्हणून आवाहन केले. त्यावर एक ग्रामस्थ म्हणाले बोर्डिंगमध्ये? आमची मुले शिकली नाही तरी चालतील पण तळदेवला आम्ही पाठविणार नाही. अशाप्रकारे अनेकदा विरोधही झाला पण हळूहळू शाळेबद्दल चांगले मत होऊन आपुलकी वाढली.

वर्ष संपले, परीक्षा झाल्या, १ मे पासून नवीन वर्षाचे प्रवेश सुरु झाले. चार-पाच अर्धी चड्डी, इनशर्ट व पांढरी टोपी घातलेली मुले त्यांच्या बरोबर डोक्यावर जुनी ट्रंक किंवा जुना कुलपाच्या डबा घेतलेले पालक व हातात छोटी पिशवी घेऊन प्राथमिक शाळेचे शिक्षक अशी छोटी छोटी टोळकी मैदानावर दिसू लागली. १ मे ते ५ मे पर्यंत असे दृश्य दिसत होते. ६ मे पर्यंत नवीन १०० प्रवेश झाले. आम्ही प्रवेश बंद करून बाहेर 'प्रवेश बंद' ची पाटी लावली त्यामुळे वस्तीगृहात फक्त शंभर मुलांना प्रवेशाची क्षमता होती. बरीच मुले प्रवेशाची शिल्लक होती. मा. एम. आर.साहेब व फळणे गुरुजी यांना निरोप पाठविला. तिसऱ्या दिवशी एम. आर. साहेब आले जीप मधून उतरून मला म्हणाले " पहिली ती पाटी काढा आता तुम्हाला सर्व प्रकारची मदत करतो शाळा चांगली चालवतात" गेल्या वर्षभरात एम. आर. साहेब शाळेकडे अजिबात आले नव्हते मात्र अधूनमधून शाळा कशी चालली आहे याबाबत परस्पर चौकशी करत होते.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्या वाढली. अनुदान मात्र तेवढेच. म्हणजे वार्षिक रुपये १०८००/- एवढे मर्यादित राहिले. विशेष फंडाची योजना ही बंद झाली. एम. आर. साहेब संस्थेच्या व आम्हा शिक्षकांच्या नशिबाने तेव्हा जिल्हा परिषदेत शिक्षण सभापती झाले. त्यांनी तळदेव ची शाळा, केंद्र शाळा, वस्तीगृह या योजनेत बसवून वस्तीगृहाच्या खर्चाची कायमची तरतूद करून ठेवली. अन्यथा वस्तीगृहाची सोइ अभावी ही शाळा बंद करावी लागली असती. आणि आजचे शाळेचे चित्र असे दिसलेच नसते. त्या दृष्ट्या पुरुषाचे या भागावर अनंत उपकार आहेत. त्यांना माझे शतशः प्रणाम. त्यानंतर अनेकदा विद्यार्थी संख्या व अनुदान वाढवून दिले. आम्ही प्रस्ताव मांडायचा. आणि त्यांनी तो जिल्हा परिषदेत मंजूर करून घ्यायचा. असेच सत्र सुरू झाले. तशी ही संस्था व त्यात काम करणारे कर्मचारी खूपच नशीबवान आहोत. कारण या संस्थेतील पदाधिकारी पैकी कोणी ना कोणी पंचायत समिती व जिल्हा परिषद पदाधिकारी आहेत. एम.आर.साहेबांनंतर त्यांचे पुत्र माननीय श्री बाळासाहेब भिलारे यांनी तोच वसा पुढे चालविला आहे.

आता खऱ्या अर्थाने शाळेच्या प्रगतीला वेग आला होता. १९७३ नंतर शाळेला ११ वी चा वर्ग सुरू करून मुलांना शालांत परीक्षेत बसता यावे असे प्रयत्न सुरू केले. पुण्यात एस.एस.सी. बोर्डाचे ऑफिसमध्ये नोंदणीसाठी प्रस्ताव घेऊन गेलो." तेथे आता तुम्ही ११ वी चा वर्ग सुरू करू नका कारण पुढील दोन वर्षांनी हा वर्ग बंद करावा लागेल. १९७५ पासून दहावीनंतरच शालांत परीक्षा होणार आहे. पुढील वर्षी दहावीचे शालांत परीक्षेसाठी नोंद करा" असा सल्ला मिळाला.

१९७५ साली शाळेतील शालान्तपरीक्षेची पहिली बॅच परीक्षेला बसली तीन वर्षे निकाल अनुक्रमे ३४ टक्के ३५ टक्के लागला मखरीयातील शिक्षकांचे मार्गदर्शनाने तो वाढवून चौथ्या वर्षी ६० टक्के लागला. १०७८ च्या नोव्हेंबरमध्ये महाबळेश्वरला त्यावेळचे शिक्षणसंचालक श्री.चिपळूणकर साहेब आले होते. तेथील शाळेचे सर्व मुख्याध्यापकासोबत त्यांची भेट घेण्याचा योग आला. त्या वेळी मी त्यांना शाळा पाहण्यासाठी येण्याची विनंती केली, "तुमच्या शाळेत काय विशेष आहे" असे त्यांनी विचारल्यानंतर "आम्ही अडचणीत शाळा कशी चालवतो ते पाहण्यासाठी या." असे म्हणालो. त्यावर ते लगेचच हो म्हणाले व मला स्वतःला बरोबर गाडीत बसण्यास सांगितले. मला अक्षरशः दरदरून घाम आला, आता आपण त्यांना काय दाखवायचे. असा मनात विचार आला जेवण झाले नंतर त्यांनी इतरांना मिटींगचे कामकाज सुरू करण्यास सांगितले व आम्ही दोघे तळदेवला निघालो. रस्त्यात दोन ठिकाणी थांबून मुले डोंगरातून कशी येतात. प्रवासाची अडचणी काय आहेत, वगैरे सांगितले. शाळेच्या ग्राउंडवर गाडीतून उतरलो. शाळेत परिसर नजरेत भरेल इतका स्वच्छ व टापटीप होता. शाळा कॉसमॉस व इतर फुलांनी बहरली होती. सर्व पाहून ते म्हणाले," हे सर्व मी येणार म्हणून केलेले नाही." प्रथम भेटीतच त्यांना शाळेबद्दल आकर्षण वाटले. वस्तीगृह दाखविले रात्री वस्तीगृह व दिवसा शाळा कशी भरते, बेंच बाजूला करून मुले वर्गात कशी झोपतात, हे सांगितले. शाळेतील शिक्षकांशी बोलायचे आहे असे म्हणाले. पुरेशा खुर्च्या नसल्याने शाळेच्या ग्राउंडवर सतरंजी टाकून मीटिंग झाली. त्यांनी अनेक बाबींची चर्चा केली. शिक्षकांना पूर्णपणे मोकळेपणाने बोलते केले. त्या वेळी आम्ही एक उच्चपदस्थ अधिकारी सोबत बोलत आहोत याचे भानही राहिले नाही. गतवर्षीचा एस. एस. सी. परीक्षेचा निकाल विचारला. त्यांनी ६० टक्के सांगितला पुढील वर्षी किती लागेल असे विचारल्यावर श्री.एम.जी. जाधव यांनी ६० टक्के लागेल असे सांगितले. ते त्यांना खूपच भावले पुन्हा शाळेत येईन असे सांगून साहेब गेले. आपण एका मोठ्या अधिकाऱ्याला ७० टक्के निकालाची आश्वासन दिले आहे प्रत्येकाने आपल्या विषयाचा निकाल ७०% च्या खाली येणार नाही याची काळजी घ्यायची असे तेथेच ठरले.

आता शिक्षक आणखी कामाला लागले. वर्गावर जाण्यासाठी आणि जादा तास घेण्यासाठी शिक्षकांमध्ये तक्रारी होऊ लागल्या. ४-५ दिवसात साहेबांचे एक सविस्तर मार्गदर्शन पर पत्र आले. आम्ही सर्वजण भारावून गेलो. दहावीचा निकाल हे एकच लक्ष सर्वांत पुढे होते सर्वांपुढे होते सर्वांत पुढे होते. त्यावर्षी 1979 ला निकाल ९३ टक्के लागला निकाल लागल्यावर जुलैचे सुट्टीत मी पुण्याला साहेबांना भेटण्यासाठी गेलो त्यावेळी साहेब म्हणाले, तुमचा निकाल कॉपी करून लागला आहे. असे मला समजले. त्यावर पुढील वर्षाचा निकाल शंभर टक्के असेल आणि आमचे कोणीही शिक्षक केंद्रावर जाणार नाहीत. असे मी आजच आपणाला आश्वासन देतो, असे सांगितले.

जुलैच्या सुट्टीनंतर पहिल्या दिवशीच च्या मीटिंगमध्ये साहेबांना यावर्षी १००% निकालाचे आश्वासन दिले आहे. असे मी शिक्षकांना सांगितले. परीक्षेचे काळात आमचे कोणीही शिक्षक पर्यवेक्षक म्हणून केंद्रावर गेले नाहीत. निकाल १०० टक्के लागला. ती परंपरा आजही चालू आहे. या शाळेचा किंबहुना संस्थेतील सर्व शाळांचा निकाल सतत ९० टक्के च्यावर असतो. ही घडी आजी उत्तम बसलेली आहे. आदरणीय चिपळूणकर सरांची भेट शाळेला किंबहुना संस्थेला परिस्पर्श सारखी झाली शाळेचे सोने झाले.

तळदेवची शाळा आता साहेबांनी खऱ्या अर्थाने उजेडात आणली. ते अनेक ठिकाणी अडचणीत कसे काम करावे हे पाहण्यासाठी तळदेव ची शाळा पाहून या असे सांगत असत. त्यामुळे अनेक शिक्षणप्रेमी, धडपडणारे शिक्षक, मुख्याध्यापक, अनेक अधिकारी शाळा पाहण्यासाठी येऊ लागले. केंद्र सरकारच्या शिक्षण खात्याचे शिष्ट मंडळाने शाळेला भेट दिली. त्यावेळी निरनिराळ्या सात राज्यांच्या शिक्षकांसंचालकांचा त्यात समावेश होता. पुढील १०-१५ वर्षात राज्याचे सर्व संचालक अनेक विभागीय उपसंचालक यांच्या शाळेला वारंवार भेटी झाल्या. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा खूपच झाला. या सर्वांचे विश्वासास पात्र राहावे. शाळेच्या उत्कृष्टते बाबतीत त्यांचा भ्रमनिरास होऊ नये.. यासाठी आम्ही सर्वजण रात्रंदिवस सतत जागरूकतेने काम करत आहोत. या सर्व धडपडीचा मला व्यक्तिगत फायदा झाला. सांगली, जळगाव, पुणे आकाशवाणी केंद्रावर धडपडणारी शाळा व धडपडणारा मुख्याध्यापक याबद्दल मुलाखत प्रसारित झाली. तसेच दूरदर्शनवर संपूर्ण शाळेचे चित्रीकरण प्रसिद्ध करण्यात आले. केंद्र सरकारच्या माहिती व नभोवाणी मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक दौऱ्यामध्ये केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी करण्यात आले.एस.एन.डी. टी. कॉलेजच्या प्रमुख माधुरी शहा यांचे सूचनेमुळे मला वर्ल्ड एज्युकेशन फेलोशिप मिळाली. व ऑस्ट्रेलियामध्ये ॲडीलेड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वर्ल्ड एज्युकेशन परिषदेत सहभागी होण्याचा योग आला. त्यामुळे निरनिराळ्या देशातील शिक्षण पद्धतीचे माहिती मिळाली. त्याचा फायदा संस्थेच्या विकासासाठी करता आला. त्यांचे मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासाचे अनेक नवनवीन प्रयोग शाळेत राबविण्यात आले. शाळेच्या एसएससी निकालावरून शाळेची गुणवत्ता ठरवू नये असे चिपळूणकर साहेब नेहमी म्हणत. नैतिक शिक्षण, लोकसंख्या शिक्षण, टाकाऊ पासुन टिकाऊ, बाहुली नाट्य,संपर्कात दिसते संपर्काधिष्ठित शाळा असे अनेक प्रयोग शाळेत राबविण्यात आले. लोकसंख्या शिक्षणांतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प राबविणारे महाराष्ट्रातील पहिली शाळा ठरली. थोडक्यात तळदेव शिक्षण खात्याची एक प्रयोगशाळा झाली. शाळेचे नाव सर्वदूर पसरले. तळदेव बद्दल एक वेगळेच शैक्षणिक वातावरण तयार झाले. तेथे सतत चैतन्य व उत्साह दिसू लागला. शिक्षण खात्यामार्फत अनेक कार्यक्रम तळदेव मध्ये आयोजित होऊ लागले. योगासने शिबिरे, नवीन अभ्यासक्रमाचे शिबिरे,आरोग्य शिबिरे, शेतकरी मेळावा इत्यादी सारखे अनेक उपक्रम शाळेत आयोजित होऊ लागले. त्या निमित्ताने निरनिराळ्या खात्यातील अधिकारी ,कर्मचारी यांचा शाळेशी संपर्क वाढला. त्यामुळे शाळेच्या लौकिकात भर पडली.

तळदेव ची शाळा आता बऱ्यापैकी स्थिरावत चालली होती. विद्यार्थी संख्या व त्याबरोबर शिक्षक ही वाढले. शिक्षक - शिक्षकांमध्ये काही मतभेद झाल्यास शिक्षकांना दुसऱ्या ठिकाणी बदलता यावे या विचारातून दुसरी शाळा असावी असे वाटले व त्यातूनच सायगाव येथे दुसरी शाळा सुरू करण्यास अध्यक्षांनी सहमती दिली. मी श्री.मेरुलिंगकर यांचे सहकार्याने ही शाळा चार-पाच वर्षे विनाअनुदान तत्त्वावर चालवली. चार-पाच वर्षातच सायगाव शाळा सुद्धा जिल्ह्यातील एक उत्कृष्ट शाळा म्हणून नावारूपाला आली. हे सर्व श्रेय श्री. एच.आर.पवार व श्री.धर्मराज ससाने सर यांचे आहे.

या सर्व काम करतात कामकाजात संस्थाचालकांचे सहकार्य मोठे होते. सन १९८० ला माननीय एम आर साहेबांचे जागी श्री जी जी कदम यांचे अध्यक्षतेखाली नवीन संचालक मंडळ आले. श्री जी जी कदम यांचे नंतर श्री किसन जाधव अध्यक्ष झाले. या तीन अध्यक्षांच्या समवेत मला काम करण्याची संधी मिळाली. कोणीही संस्थेच्या कामकाजात अडसर तर आणला नाहीच. उलट सतत प्रोत्साहन दिले. त्यामुळे संस्थेच्या वाढीला सतत चालना मिळाली. या सर्वांच्या सहकार्यामुळे व सततच्या प्रोत्साहनामुळे अतिशय दुर्गम भागात ९ माध्यमिक शाळा व ५ वसतिगृहे, मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व दोन ठिकाणी उच्च माध्यमिक शाळा एवढा व संस्था संस्थेचा विस्तार करता आला. या सर्व शाळांचे व्यवस्थापन उत्तम होते. निकाल उत्तम होता. यामुळे व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाकडे मिळणारे रुपये १००००/-चे प्रोत्साहनात्मक अनुदान संस्थेच्या ४ शाळांना मिळाली. एक बंद पडत असलेली शाळा चालू करून ती जगविली, वाढविली व ती नावारूपाला येऊन तिचे नाव जगातील ३४ देशात गेले व या संस्थेचा विस्तार होऊन कोयना, सोळशी व कांदाटी खोर्यात एक चैतन्य शैक्षणिक चळवळ उभी करता आली. हजारो विद्यार्थी किमान दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकले. सुरुवातीला मुली शाळेत येतच नव्हत्या. आता प्रत्येक शाळेत ५० टक्के मुली मुलांबरोबर शिकताहेत हे वेगळेच समाधान. यामुळे जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटते.

वसतिगृह हा तळदेव शाळेचा आत्मा वसतीगृहा विना ही शाळा चालल्याने शक्य नाही. सातारा जिल्हा परिषद ही आपल्या सेष फंडातून वसतीगृहे चालविणारी महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद आहे. संस्थेच्या ३ वसतिगृहांना जिल्हा परिषद अनुदान देते सुरुवातीला जिल्हा परिषद कडून मिळणाऱ्या अनुदानातून मुलांना दोन वेळचे पुरेसे जेवण देणे कठीण पडे. त्यामुळे सकाळी मुले १० वाजता जेवल्यानंतर त्यांना सायंकाळी ८ पर्यंत म्हणजे जवळजवळ दहा तास मध्ये काही खायला मिळत नसे दुपारचे सुट्टीत त्यांना काहीतरी खायला कसे मिळेल याचा सारखा प्रयत्न करीत असतानाच श्री. शेणॉय यांची गिरिस्थान हायस्कूलमध्ये भेट झाली. ते शाळेतील गरीब मुलांना मदत करतात असे समजले. त्यांना तालदेवची शाळा पाहण्यासाठी येण्याची विनंती केली. त्याच दिवशी दुपारी शाळेत घेऊन आलो.त्यांनी शाळा पाहिली. वसतिगृह, किचन, शिक्षक निवास वगैरे सर्व पाहिले अनेक फोटो काढून नेले. प्रथम पुस्तके व या शालेय साहित्य त्यासाठी त्यांनी वीस मुलांना मदत देण्यास सुरुवात केली. वसतिगृहात राहणाऱ्या वाढत्या वयाच्या मुलांना सकाळ व संध्याकाळचे जेवण दरम्यान जवळ जवळ दहा तास काहीच खायलामिळत नाही व त्यांना मधल्या सुट्टीत काहीतरी खाण्यास मिळणे आवश्यक आहे. हे अनेक वेळा पत्रव्यवहारातून पटवून दिले. व त्यांनी दुपारचे जेवणाचे वेळी खाण्याची व्यवस्था केली. त्यात अंडी, पाव, पोहे, उपीट, फळे, इत्यादींचा समावेश केला त्याचा वसतिगृहाचे हजेरीवर चांगलाच परिणाम होऊन हजेरी वाढली व मुलांची प्रकृतीही सुधारण्यास मदत झाली. श्रीमती ख्रिस्तिना इंडरबिटझीन, स्वित्झर्लंड व शेणॉय यांनी शेणॉय व इंडरबिटझीन सोशल ऍक्टिव्हिटीज असोसिएशन, स्वित्झर्लंड या संस्थेमार्फत सतत १८ वर्षे मदत केली. संस्थेतील इतर शाळेतील मुलांना ही गणवेश, शालेय साहित्य, पुस्तके इत्यादी मदत केली.

आपण चांगले काम करीत असताना मदतीचे अनेक हात आपोआप पुढे येतात. हाही अनुभव अनेक वेळा आला. आपण फुल बनावे. भुंगे आपोआप जमा होतात, असे चिपळूणकर साहेब म्हणायचे. एका उन्हाळ्यात मे मध्ये कोल्हापूरमधील पाच सहा शिक्षक महाबळेश्वर तापोळा सहलीसाठी आले होते. तापोळ्याहून परत जाताना रस्त्यात शाळा दिसली म्हणून त्यांनी शाळेला भेट दिली. कामाची माहिती देणे व शाळेच्या अडचणी व गरजा त्यांना सांगणे असे आम्ही नेहमीच करत असू. या शिक्षकांना शाळेची सर्व माहिती सांगितली. नंतर त्यातील शिंदे नावाच्या शिक्षकाने साधना नावाच्या मासिकांमध्ये शाळेबद्दल एक लेख लिहिला. त्याचे समाजातील दातृत्ववान लोकांनी शाळेला सहकार्य करावे असे आवाहन केले. हा लेख पु. ल. देशपांडे यांच्या वाचनात आला व त्यांनी शिक्षण संचालक श्री. चिपळूणकर साहेब यांना या शाळेबद्दल मला अधिक माहिती पाहिजे, या शाळेला मदत करायची आहे असे सांगितले. श्री. चिपळूणकर साहेबांनी मला बोलावून त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यावेळी शाळेला कोणकोणत्या गरजा आहेत याबाबत चर्चा झाली व शाळेसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा करण्यासाठी रुपये पंचवीस हजार दिले. मुलींचे वस्तीगृहासाठी असे मिळून एकूण १२५०००/- मदत त्यांनी दिली. हा आमचे टोपीत सरपेच होता. कारण मारणाराला पु. ल.कधीच मदत देत नसत. त्यांना योग्य वाटेल. भावेल त्यांना ते मदत करीत असत. तर पु. ल.तळदेवला आले तेव्हा शाळा पाहून म्हणाले होते "ही शाळा म्हणजे एखाद्या मोडक्या पेटीत सुंदर दागिना असावा अशी आहे".

संस्थेला सातत्याने आर्थिक मदत करणारा रोटरी क्लब महाबळेश्वर डॉक्टर ठोके, डॉक्टर रेड्डी, डॉक्टर दिलीप पाटील इत्यादी संस्थेला सातत्याने मदत करीत असत. तळदेव मधील वाचनालयाची खोली, कुंभरोशी येथील वसतिगृह इमारत, सायन्स व संगणक प्रयोगशाळा या इमारती बांधकामास मदत केली. वसतिगृहातील मुलांसाठी ताटे, तांबे, स्वयंपाकाची भांडी, ब्लॅंकेट इत्यादी घेऊन दिली. हीसुद्धा संस्थेच्या चांगल्या कामाची पावती.

१९८९ च्या जुलैमध्ये तळदेव चे शाळेवर अस्मानी संकट आले. वादळाने शाळेच्या दोन्ही इमारतीवरील पत्रे उडून गेले. वसतिगृहातील मुले उघड्यावर पडली. त्यावेळी सुद्धा शाळा पुन्हा उभी करणे फारच गरजेचे होते. माझी पत्नी याअगोदर नुकतीच निवर्तली होती. मी त्यातून सावरत होतो. नुकताच तेवढ्यात हे संकट आले. त्यावेळी सर्व संचालकांनी विशेषतः किसन जाधव यांनी दीपचंद गार्डी यांचेकडून इमारतीसाठी दोन लाख रुपये मिळवले. ज्यांना ज्यांना मदत मागितली त्यांनी उत्स्फूर्तपणे दिली. समाजातील दातृत्वाचे अनेक हात पुढे आले. कोयना भूकंप फंडातून मदत मिळाली.

संस्थेच्या सावली, आपटी, कुंभरोशी, वाघावळे, तापोळा, सायगाव या शाखेच्या इमारतीही समाजातील दातृत्ववान व्यक्तींचे सहभागातूनच उभ्या राहिल्या. संस्थेची आपल्या गावच्या शाळेच्या विकासाचे दृष्टीने सतत धडपड सुरू आहे. शाळांचे निकाल उत्तम लागत आहेत. हे पाहून त्या त्या गावातील लोकांनी इमारतीसाठी जागा दिल्या.

मनुष्य हा खूप आशावादी असतो. त्याच्या अपेक्षा सतत वाढत असतात. तळदेव शाळेचा निकाल केव्हा ९३ टक्के लागला, त्यावेळी मी दहावीचे वर्गातील मुलांना म्हणायचो आपला निकाल १०० टक्के लागला. तर मला सुखाने मरण येईल शाळेचा निकाल पुढील वर्षी शंभर टक्के लागला. आता प्रत्येक शाळेचा निकाल शंभर टक्के लागावे असे वाटू लागले. तेही अनेकदा लागले आता मुले बोर्डाच्या गुणवत्ता यादीत यावीत, अशी अपेक्षा वाटू लागेल.

शाळांच्या संस्थेच्या विकासाची स्वप्ने मला पडत. तळदेव येथे वस्तीगृहाची व शाळेची स्वतंत्र इमारत असावी, असे मला अगदी सुरुवातीपासून वाटत असे, श्री शेणॉय यांना याबाबत बऱ्याच वेळा सांगितले. तथापि त्यांचे संस्थेतून इमारत बांधण्यास मदत देता येत नव्हती. त्यावेळी ते शक्य झाले नाही.

आदरणीय श्री. मेहता साहेब यांनी दापवडी शाळेसाठी मदत मिळवून दिली. तथापि जागेअभावी की मदत परत करावी लागली. ही संस्थेच्या दृष्टीने नामुष्कीची बाब होती. त्यांचा गैरसमज दूर व्हावा, संस्थाचालक निष्क्रिय आहेत. असे त्यांना वाटू नये म्हणून त्यांनी त्यांना मी तळदेव येथील संस्थेचे कामकाज पाहण्यास अनेक वेळा विनंती केली. शेवटी आदरणीय श्री. भिलारे गुरुजींचे मदतीने त्यांना तळदेवला येण्यास प्रवृत्त केले. मला नेहमी खात्री असे की तळदेवला आलेली व्यक्ती ही नक्कीच तळदेव शाळेच्या प्रेमात पडते आणि तसेच घडले. तळदेवला दोन-तीन भेटी दिल्या व त्यांच्या पुढे शाळेची स्वतंत्र इमारत, भोजनगृह आणि पुरेशी स्वतंत्र स्वच्छतागृह हे प्रस्ताव मांडले ते त्यांनी बारकाईने व चिकित्सकपणे चर्चा करून मान्य केले. श्री. किसन जाधव व श्री.डी.के.जाधव यांनी पाठपुरावा करून या सर्व योजना अत्यंत उत्कृष्टपणे पूर्ण करून घेतल्या. शाळा व वस्तीगृहाच्या स्वतंत्र इमारतीचे स्वप्न पूर्ण झाले. आता पूर्णपणे कृतार्थतेची समाधान वाटते.

या सर्व वाटचालीत माझ्या पत्नीने सुरुवातीला खूपच मदत केली. वसतिगृहातील मुलींच्या वेण्यासुद्धा त्यांनी घातल्या मला माझ्या स्वतःचे मुलांकडे लक्ष देता येत नसे. ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. त्यांचे शिक्षण व त्यांचे वर चांगले संस्कार केले. दुर्दैवाने त्यांची साथ अर्ध्यावर संपली या सर्व वाटचालीत माझी सुरुवातीचे सर्व सहकारी ज्यांनी तळदेव शाळेचे व संस्थेचा भक्कम पाया घातला. ते श्री. बावळेकर, श्री. सुभाष कदम, श्री. एच. आर. पवार, श्री. एम. जी. जाधव, श्री. आर. पी. फरांदे, श्री. एस. टी. जाधव यांची उत्तम साथ मिळाली. संस्थेचा सचिव म्हणून काम करीत असताना एम.आर. साहेब जी. जी. कदम व श्री किसन जाधव यांनी पूर्ण स्वातंत्र्य देऊन सहकार्य केल्याने संस्थेच्या प्रगतीचे काम चांगल्या प्रकारे करता आले.श्री.किसन जाधव अध्यक्ष नव्हते तेव्हा सुद्धा मी संस्थेचे अडचणीचे वेळी त्यांच्याकडे जायचो. ते नेहमी मदत देऊन तात्काळ अडचण दूर करीत असत. संस्थेच्या निरनिराळ्या शाखा निघाल्या नंतर मिळालेल्या चांगले शिक्षकांपैकी श्री. ढोले, श्री. एस. एस. जाधव श्री. एन. एस. जाधव आणि आत्ताचे सर्व शिक्षक यांचा संस्थेच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. संस्थेतील सर्व लिपीत विशेषतः श्री. भगवान कदम, श्री. देशमाने, श्री. उत्तेकर, श्री. समाधान फरांदे व आत्ताचे लिपिक यांचेही संस्थेत मोठे योगदान आहे.

संस्थेच्या व शाखांच्या दररोजच्या कामकाजात यांचा महत्त्वाचा भाग असतो. असे सर्व चतुर्थश्रेणी कर्मचारी, श्री. सुरेश भालेराव, श्री. दिलीप कदम, श्री. नारायण फळणे, श्री शिंदेमामा, मोरेमामा व आत्ताचे सर्वजण हे अत्यंत नम्र व कार्यतत्पर आहेत.

यापुढे संस्था हीरकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणार आहे. त्यावेळेपर्यंत संस्थेत काही व्यवसाय अभ्यासक्रम सुरु व्हावेत. शिक्षकांसाठी गुणवत्तावाढीचे कायमस्वरूपी नियोजन असावे. मुलींचे सबलीकरणासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी व्यायाम, योगासने, नियमित वैद्यकीय तपासणी यासारखे उपक्रम राबविण्यात यावेत. मुलांचे कलागुणांना वाव देण्यासाठी श्री. किसन जाधव यांनी सुरू केलेल्या कला अकादमीचे पुनरुज्जीवन व्हावे. काळाची गरज म्हणून इंग्रजी माध्यमाच्या काही शाळा सुरू व्हाव्यात. ही संस्थेची पुढील सद्दिष्टे असावीत.