Reg No. F-51/Satara/30/4/1963 Mumbai/69/N.S.T.R

blog

ज्ञानगंगेच्या माध्यमातून परिसराचे पोषण (श्री . किसन जाधव)
०२-जानेवारी -२०१४

महाबळेश्वर तालुक्यातील सप्तशिवालयाच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरातील १०५ गावांपैकी कोयना काठावर वसलेले देवळी हे माझे गाव. मनाला भुरळ पाडणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा, विहंगम परंतु अतिदुर्गम दऱ्याखोऱ्यातील पाऊलवाटा , नानाविध आकारांच्या वळणांच्या सोबतीने आणि कोयना धरणामध्ये विस्थापित असून माझा जीवन प्रवास सुरु झाला.

प्राथमिक शिक्षण गावात व इयत्ता पाचवी पर्यंतचे शिक्षण शेजारच्या खरोशी गावी पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईचा रस्ता धरला. बालपणीच्या सवंगड्याना अर्ध्यात सोडून जाताना, केवळ व्यवस्थेच्या अभावामुळे शिक्षण थांबले हि खंत मनाच्या तळाशी घर करून राहिली. पुढे जीवनात शिक्षण बरोबर समाजकारण आणि त्याच्या जोडीला राजकारण असा प्रवास घडला.

महाबळेश्वर तालुक्यातील देवळी या अतिदुर्गम गावचा माझ्यासारखा सामान्य माणूस मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक, सुधारसमिती अध्यक्ष व विरोधी पक्षनेता होतो. ही माझ्यासाठी आपल्या मातीचा गुणधर्म, माझ्या आई वडिलांचे संस्कार, माझ्या कुटुंबियांचे सहकार्य व आपल्या सर्वांचे आशीर्वाद. या कालावधीत अनेक विकासकामे करता आली, अनेक प्रश्न मांडता आले. अनेक समाजउपयोगी संस्था निर्माण करता आल्या कामांचा पसारा वाढला पण जन्मभूमीला विसरलो नाही. भागाच्या विकासासाठी 'भागातील मुंबईकरांना' एकत्र करून 'जावली उत्कर्ष मंडळाची' स्थापना केली. वर्षानुवर्षे विकासाचे स्वप्न पाहत बसलेल्या माझ्या भागाची सेवा घडावी हा हेतू मनात होता. जावली उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून भागाचे प्रश्न समजावून घेत होतो. वेळात वेळ काढून गावी येणे घडत असे. आमच्या भागाचे नेतृत्व कै. आमदार जी. जी. कदम (अण्णा) करीत होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार संस्था विकास पावत होती. या शैक्षणिक कार्यात आम्ही सहभागी झालो. तळदेव परिसरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याने समाधान वाटत होते. अण्णांच्या आकस्मित निधनानंतर महाबळेश्वर, जावली तालुक्यातील जुन्याजाणत्या शिक्षणप्रेमींनी व शिक्षणसंस्थेच्या संचालकांनी अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. सगळ्यांच्या प्रेमळ अगरहाखातर आणि भागातील मुलामुलींच्या उत्कर्षासाठी मी अध्यक्षपद स्वीकारले.

माझ्याकडे अध्यक्ष पदाची सूत्रे येण्यापूर्वी १९६४ पासून १९९६ या कालावधीत संस्थेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी कै. के. एल. मोरे, कै. भिलारे गुरुजी, कै. एम आर भिलारे व कै. आमदार जी. जी. कदम (अण्णा) यांनी समर्थपणे पार पाडली. संस्थेच्या प्रारंभीच्या या काळातील अनेक अडचणी व समस्यांवर मात करीत झालेला संस्थेचा विकास या मान्यवरांच्या कार्याची ओळख करून देतो. महाबळेश्वर महाबळेश्वर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे व संस्थेला सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करणारे सातारा जिल्हा परिषदेचे सभागृह नेते मा. बाळासाहेब भिलारे (दादा) यांना संस्थेच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने अभिवादन करतो.

माझ्या या शैक्षणिक सहकारी, सामाजिक व राजकीय वाटचालीत मोलाचे मार्गदर्शन करणारे मा.टी. एम. कदम, मा. के. बी. सुर्वे, तसेच माझे सवंगडी मित्र ज्यांनी माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये ४० वर्षे मला सांभाळून घेतले ते मा. डी. के. जाधव, मा. बी. व्ही. शेलार व मा. जी.एम. चव्हाण तसेच ग्रामीण भागातील महाबळेश्वर तालुक्यातील जेष्ठ नेते मा. धो. ह. जाधव (बापू), फळणे गुरुजी, टी के बाबर सर, बा. ल. जंगम गुरुजी व धो.श. जंगम या सर्व सन्माननीय संचालकांच्या सहकार्याने संस्थेचा विकास रथ आम्ही पुढे घेऊन जात आहोत या कार्यात विद्यार्थी व त्यांचे पालक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, प्राचार्य व वसतिगृह कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्यामुळेच या सर्वाना मी सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने धन्यवाद देतो.

ज्ञानकर्मयोगाचे वर्णन करताना आलेल्या श्रीमदभगवदगीतेच्या चौथ्या अध्यायातील अडतिसाव्या श्लोकाचा पूर्वार्ध 'न हि ज्ञानेन सदृश पवित्रमिह विद्यते' संस्थेने ब्रीदवाक्य म्हणून धारण केलेले आहे खरोखर या जगात ज्ञानासारखे पवित्र काहीही नाही मला वाटते 'Knowledge is the foundation of lasting progress' व्यक्तिविकास समाजविकास व राष्ट्रउन्नती साधणारे हे ज्ञान आमच्या संस्थेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यन्त पोहोचते आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. उंच कड्याकपारीत वास्तव्य करून गगनभरारी मारणारा 'गरुड' आमच्या संस्थेचे प्रतीक आहे.

खडतर भौगोलिक परिसराची दुर्गमता शिक्षणासारख्या आत्मउन्नतीच्या मार्गात येऊ नये, आणि आमच्या विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ विचार करण्याची क्षमता व बौद्धिक कुतूहल निर्माण व्हावे यासाठी संस्था सतत प्रयत्न करीत आहे. भागाच्या समस्या, अडचणी अनेक आहेत. पण काळ्याभिन्न कातळ कपारी फोडून अंकुर बाहेर येतातच ना? संस्थेने या गेल्या पन्नास वर्षाच्या कालावधीत गरजेनुसार अनेक शाखा काढल्या व टिकवल्या. अनेक शालोउपयोगी उपक्रम व कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केले. संस्थेतील मुख्याध्यापकांचे कुशल प्रशासन, शिक्षकांचे नियोजनबद्ध अध्यापन, विध्यार्थ्यानी मनापासून करीत असलेले अध्ययन यांच्या जोडीला आम्हा संस्था संचालकांचे सुयोग्य व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे, भागातील शिक्षणप्रेमी मित्रांचे पर्यावरण व मार्गदर्शन आम्हाला लाभत असल्यानेच अल्पावधीत आमच्या संस्थेने गरुड भरारी घेतली आहे.

भरपूर पावसाचा, तीव्र उताराच्या नद्यानाल्यांच्या, उंचचउंच डोंगरांचा, खालोखाल दऱ्या यांच्या या प्रदेशातून विद्यार्थ्यांना दररोज शाळेत ये - जा करणे केवळ अशक्य असल्याने जिल्हा परिषद सातारा व समाजकल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने संस्था पाच वसतिगृहे चालवते. वसतिगृहातील मुलामुलींना आवश्यक अशा भौतिक सुविधा सुधारणा पुरविण्याचा संस्था प्रयन्त करीत असते. या कामी समाजातील दानशूर व्यक्तींचे सहकार्य आम्हाला लाभते. काही प्रसंगी राजकीय व्यक्तींनीही आम्हाला सढळ हाताने मदत केली आहे. मिळालेल्या देणगीचा संस्थेने केलेला योग्य वापर पाहून अनेक प्रसंगी समाजातील दानशूरांनी, संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी, संस्थेने टाकलेला शब्द उचलून धरलेला आहे. विशेषतः लंडनमध्ये आपला व्यवसाय करून ह.भ.प. कळंबे महाराज यांना आध्यत्मिक गुरु मानणारे व महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे उद्योगपती मा. रजनीकांत मेहेता आणि त्यांचा मित्र परिवार यांनी शाळांच्या इमारती उभारणीमध्ये तसेच विध्यार्थ्यांना सोई सुविधा पुरविण्याच्या बाबतीत सहकार्य केलेले आहे. त्यांचे आम्हीं व संस्था कायम ऋणी आहोत.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जास्तीत जास्त सर्जनशील निर्मिती होत असते, असा मला विश्वास आहे. श्री. मल्लिकार्जुन विद्यालय वाघावळे उचाट या शाखेला तर चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. पक्के रस्ते नाहीत, वाहतुकीची साधने नाहीत, वादळवाऱ्यात जीव मुठीत धरून लॉंचमधून नदीचा प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात लॉँचसेवा बंद असते तेंव्हा त्या गावचा, आमच्या शाळेचा संपर्क तुटतो अशा परिस्थितीशी तोंड देत सर्वांच्या सहकार्याने सहकार्याने संस्था समाजशिक्षणाचे व्रत व्रतस्थ वृत्तीने करीत आहे. संस्थेने विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक संस्कारक्षम कार्यक्रम, उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे आमची संस्था अल्पावधीत नावारूपाला आली आहे. त्या अनेकविध उपक्रमांचा थोडक्यात उल्लेख खालीलप्रमाणे :

 • पालक शिक्षक संघाच्या सहविचार सभेत संस्थेचा सहभाग
 • शाखांवर शाळा विकास समिती
 • नवागतांचे भावपूर्ण स्वागत
 • विद्यार्थी व सेवकवृंदाचे वाढदिवस
 • संस्थांतर्गत क्रीडास्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम
 • पर्यावरण वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
 • काव्यगायन वक्तृत्व स्पर्धा
 • जाडा तास, दीर्घ सुट्टीतील तास, रात्र अभ्यासिका
 • उपस्थित सुधारणा आरोग्य तपासणी, वैद्यकीय शिबिरे
 • शैक्षणिक सहली, वनभोजन, समाजसेवा शिबिरे
 • वार्षिक स्नेहसंम्हेलने
 • एस.एस.सी. शुभचिंतन कार्यक्रम व निरोप समारंभ
 • संस्थेच्या माध्यमातून शाळा तपासणी
 • उपक्रमशील शाळा मुख्याध्यापक शिक्षक सेवक पुरस्कार
 • उद्बोधक कार्यक्रम, व्याख्याने, कवीसंमेलन
 • कथाकथन परिसंवाद
 • सुप्रसिद्ध कलाकार शासकीय अधिकाऱ्यांचा सहवास व मार्गदर्शन
 • शालेय परिपाठात संस्थेतील संचालकांचा सहभाग
 • विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा शोध व त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे.

आजपर्यंत अनेक महान साहित्यिक मंडळींनी राजकीय व्यक्तींनी शिक्षण तज्ज्ञांनी आमच्या संस्थेस भेटी दिल्या आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक कै. पु. ल. देशपांडे शिक्षण संचालक शिक्षण संचालक मा. श्री. वि. वि.चिपळूणकर देशाचे माजी कृषिमंत्री व माजी मुख्यामंत्री मा. शरदचंद्र पवार साहेब, कै. डॉ. पतंगराव कदम साहेब व विविध क्षेत्रातील थोर व्यक्तींनी आपल्या संस्थेस भेटी दिल्या आहेत. त्यांनी केलेले मार्गदर्शन आम्हांला दिशादर्शक ठरले आहे आमच्या कामाबद्दल पाठीवर शाबासकीची थाप टाकली आहे. शेरेबूकातील त्यांचे शेरे आमच्यासाठी पुरस्कारासारखे आहेत. सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने मी व माझे संचालक मंडळ या सर्वांचे विशेष आभार मानतो.

संस्थेतून निवृत्त झालेल्या मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मदतीने संस्था, शाखांची वार्षिक तपासणी घेत असते तसेच संस्थेतील उपक्रमशील मुख्याद्यापक, शिक्षण, सेवक यांची निवड करण्यात त्यांचे सहकार्य घेतले जाते. या सहकार्याबद्दल त्यांचेही मी व माझे संचालक मंडळ आभार मानते.

अध्यक्ष म्हणून संस्थेत काम करताना जे जे चांगले वाटेल ते आमच्या शिक्षकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. अजूनही प्रश्न, समस्या अडचणी आहेत. त्या सोडवण्याचा व या दुर्गम भागातील लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न असाच करत राहू.

जागतिक स्पर्धेत आमचा विद्यार्थी टिकला पाहिजे. देश जर सन २०२० पर्यंत जगातील एक महासत्ता बनण्याचे एक स्वप्न पाहत असेल, तर त्या स्वप्नात आमच्या संस्थेतील विद्यार्थी आत्मविश्वासाने उभा राहिला पाहिजे. आमच्या संस्थेतून, सुशिक्षित, सुसंस्कृत, व सक्षम असे मनुष्यबळ निर्माण व्हावे याची संस्था मी व माझे संचालक जबाबदारी घेत आहोत. विदयार्थ्यांच्या घराघरात पोहोचलेल्या ज्ञानगंगेने परिसराचे पोषण झाले आहे. अन पुढेही होत राहील. समाजाला समता बंधुता व सामाजिक न्याय ही शिखरे गाठता यावीत, राष्ट्र समर्थ होण्यासाठी योग्य शिक्षण आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांना मिळेल असा दृढ आत्मविश्वास व्यक्त करतो.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !